Friday, August 28, 2020

९) भरतमुनी व नाट्यशास्त्र




 भारतात नाटकांची परंपरा किती प्राचीन आहे ते आपण मागच्या भागात पाहिले. आज आपण भरतांनी लिहिलेल्या नाट्यशास्त्राची माहिती घेणार आहोत.

छंदशास्त्र, गणितशास्त्र, व्याकरणशास्त्र, खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र, स्थापत्यशास्त्र, साहित्यशास्त्र, असे अनेक विषयांवर संस्कृतभाषेत शास्त्रीय ग्रंथ लिहीले गेले आहेत. नाट्यशास्त्र हे साहित्यशास्त्रातच समाविष्ट होते.
भरतमुनींनी लिहिलेला नाट्यशास्त्र हा ग्रंथ साहित्यशास्त्रातील अतिशय प्राचीन ग्रंथ आहे. भरतांच्या नाट्यशास्त्रात कोहल, शांडिल्य, वात्स्य, धूर्तिल वगैरे अन्य आचार्यांचा उल्लेख मिळतो. पण त्यांचे ग्रंथ उपलब्ध नसल्यामुळे भरतांनाच नाट्यशास्त्राचे प्रधान आचार्य मानले जाते. कदाचित त्याकाळात उपलब्ध असलेल्या सर्व मतांचा विचार करूनच नाट्यशास्त्र या विस्तृत ग्रंथाचे लेखन भरतांनी केले असल्यामुळे भरतांचा ग्रंथ व नाव लोकप्रिय झाले असावे. कारण हा ग्रंथ नाट्यशास्त्राविषयी परिपूर्ण माहिती देणारा व विशाल ग्रंथ आहे.
संस्कृत साहित्यिक आपला परिचय ग्रंथामधून देत नाहीत. एकंदर सर्व संस्कृत साहित्यक प्रसिद्धी-पराङ्मुखच आहेत. सहाजिकच संस्कृत साहित्यिकांचा काळ, त्यांची वैयक्तिक माहिती, त्यांचे कार्य याविषयी इतर ग्रंथकारांनी दिलेल्या माहितीवरूनच आणि त्यांचे उपलध असलेले ग्रंथ यावरूनच माहिती गोळा करावी लागते.
परंपरेप्रमाणे भरतमुनी हे नाट्यशास्त्राचे प्रणेते आहेत. ही गोष्ट सर्वांनी मान्य केली आहे. पुराणे वगैरे प्राचीन साहित्यात अनेक भरतांचा उल्लेख मिळतो. १) दशरथपुत्र भरत २) दुष्यंत-शकुंतलेचा पुत्र भरत की ज्यांच्या नावावरूनच आपल्या देशाला भारत हे नाव मिळालेले आहे. ३) मान्धाताचा पणतु भरत ४) जडभरत. हे सर्व भरत कोणत्या ना कोणत्या तरी राजवंशाशी संबंद्ध आहेत. त्यापैकी कोणीही नाट्यशास्त्राचा प्रणेता नसावा. नाट्यशास्त्र लिहिणारे भरत ही एक वेगळीच ऐतिहासिक व्यक्ति असावी. (काहींच्या मते भरत हे एका जातीचे नाव असावे. नाट्यशास्त्र त्यांच्या जातीय कलेचा प्रतिपादक ग्रंथ असावा. आणि त्याची रचना अनेक भरतांनी वेळोवेळी केलेली असावी). एकूण भरतांच्याविषयी कोणतीही वैयक्तिक माहिती उपलब्ध नाही. (नाट्यशास्त्रकार भरतांचा मत्स्यपुराणाव्यतिरिक्त कुठल्याही पुराणाने त्यांचे स्मरण केलेले नाही).

नाट्य़शास्त्रग्रंथाचा काळ -
कालिदासाने ‘विक्रमोर्वशीयम्’ नाटकात भरतमुनींचा स्पष्ट उल्लेख केला आहे. कालिदासाचा काळ इ. स. चे पहिले शतक ते चौथे शतक यामधे मानला जातो. कालिदासाच्या काळीच भरत हे एक पौराणिक व्यक्ति म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे नाट्यशास्त्राचा काळ इ. स. पूर्व २ रे वा ३ रे शतक मानला जात असला तरी ते त्याहूनही प्राचीन असण्याची शक्यता आहे. कारण नाट्यशास्त्राची भाषा सूत्रमय आहे. या सूत्रशैलीवरून त्या ग्रंथाची अतिप्राचीनता सिद्ध होते. त्यावरून काही विद्वान त्याचा काळ इ. स. पूर्व पाचवे शतक मानतात.

भरतांनी लिहिलेल्या ग्रंथावरून ही गोष्ट सिद्ध होते की भरतांच्या काळीच नाटक विकसित अवस्थेत होते. तोपर्यंत नाट्यशास्त्रावर अनेक आचार्यांनी ग्रंथही लिहीले होते. म्हणजे भरतांनी नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहीला व त्यानंतर नाटकप्रणाली चालू झाली असे झालेले नाही. नाट्यशास्त्रात जे नटी, नृत्य, वाद्य, संगीत, संवाद, कथावस्तु, रंगमंच यांचे जे उल्लेख आलेले आहेत त्यावरूनच भरतांच्या काळी नाटक विकसित अवस्थेत होते हे दिसून येते.
नाट्यशास्त्रानुसार भरतमुनींनी नाट्यशास्त्र लिहीले व आपल्या १०० मुलांना ते शिकवले. पुढे यातील अनेक मुलांनी नाट्यशस्त्रविषयक ग्रंथाची रचना केली.

नाट्यशास्त्रीय विवरणावरून असे दिसते की भरतमुनींचा आश्रम हिमालय पर्वतावर असावा. हिमालय पर्वतावर असणार्‍या भगवान शंकरांच्या आदेशावरून त्यांनी तांडवनृत्याचे ज्ञान प्राप्त झाले आहे. तसेच त्यांनी शंकरांसमोर त्रिपुरदाह नावाच्या नाटकात ते तांडवनृत्य सादर केले. त्यांच्या या ग्रंथात हिमलय पर्वताचे व शिव-पार्वतीच्या तांडवनृत्याचे मनोहर वर्णन आहे. त्यावरून ते हिमालयवासी असावेत असे अनुमान काढता येते. काही आलोचकांच्या मताप्रमाणे नाट्यशास्त्रात आलेल्या हिमालयातील वृक्षांच्या वर्णनावरून ते काश्मिरनिवासी असावेत.. हे सिद्ध करण्याकरता एक तर्क प्रस्तुत केला जातो की काशिमरमधे नाट्यशास्त्राचे परंपरागत अध्ययन सर्वात जास्त प्रमाणात होत आले आहे. नाट्यशास्त्रावर टीकाग्रंथ लिहिणारे लोल्लट, भट्टनायक, अभिनवगुप्त हे काश्मिरीपंडितच होते.
कालिदासाने भरतमुनींचा उल्लेख नाट्यशास्त्राचे आचार्य असा केला आहे. दामोदर गुप्त, बाण, दंडी यांच्या काळी जे नाट्यशास्त्राचे स्वरूप होते तेच स्वरूप आजही विद्यमान आहे. साधारण बाणाचा काळ इ. स. सातवे शतक मानला जातो आणि नाट्यशास्त्राचे स्वरूप त्यावेळपासून आजही तसच टिकून आहे.

नाट्यशास्त्राची निर्मिती -
भरतमुनी म्हणतात की स्वायंभव मनूचे सत्य युग उलटून गेल्यावर वैवस्वत मनूचे त्रेतायुग आले. या युगात सर्व समाज काम-क्रोधादि व्यसनांनी पोखरला गेला होता. तेव्हा सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले व त्यांनी पृथ्वीवरील दुरवस्थेची कहाणी ब्रह्मदेवाला ऐकवली. या जंबूद्वीपातील लोकांना सुखाची प्राप्ती व्हावी, त्यांनी सदाचरणी बनावे, सर्व वर्णातील लोकांना एकेठिकाणी बसून त्यांना आनंद प्राप्त व्हावा असा एखादा उपाय योजण्याची विनंती केली. तेव्हा ब्रह्मदेवाने देवतांची इच्छा पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन देवतांना स्वस्थानी पाठवून दिले. नंतर ब्रह्मदेवांने चारही वेदांचे चिंतन केल्यावर त्यांना पाचवा नाट्यवेद निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी ऋग्वेदातून पाठ्य, सामवेदातून गायन, यजुर्वेदातून अभिनय व अथर्ववेदातून रस घेऊन ५ व्या नाट्यवेदाची निर्मिती केली. देवतांमधे या नाट्यवेदाचा प्रचार करण्यास त्यांनी इंद्राला सांगितले. परंतु देवतालोक नाट्य कर्मात कुशल नाहीत. वेदांचे मर्म जाणणारे मुनीलोकच या नाट्यवेदाचे ग्रहण करण्यास व प्रयोग करण्यास समर्थ आहेत, असे इंद्राने ब्रह्मदेवाला उत्तर दिले. म्हणून ब्रह्मदेवांनी भरतमुनींना हा पंचमवेद दिला व त्याचा प्रसार करण्यास सांगितले. ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार भरतमुनींनी ह्या ५ व्या नाट्यवेदाचे शिक्षण आपल्या १०० मुलांना दिले .
भरतमुनींनी ह्या नाट्यवेदाचा भार स्वीकारल्यानंतर स्त्रीपात्रांसाठी अनिंद्यसुंदर अप्सरांची योजना केली. रंगशाळेची जबाबदारी विश्वकर्म्यावर सोपवली. सर्व सामग्रीने सुसज्जित होऊन ते ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवांनी त्यांना इंद्राच्या ध्वजोत्सवात या नाट्यवेदाचा सर्वप्रथम प्रयोग करण्यची विनंती केली. त्याप्रमाणे प्रथम त्यांनी इंद्रविजय नाटक सादर केले. या प्रयोगात देवांचा विजय व दानवाचा पराजय दाखवलेला पाहून देव प्रसन्न झाले व त्यांनी त्यांना बक्षिसे दिली. पण दानव क्रुद्ध झाले व नाटकात विघ्ने निर्माण करू लागले. म्हणून इंद्राने दानवांना प्रत्युत्तर दिले व नाट्यगृह बनवण्याची विश्वकर्म्याला आज्ञा दिली. नाट्यगृह निर्माण झाल्यावर स्वत: ब्रह्मदेवाने तिथे देवतांची स्थापना केली. त्यामुळे नाटकातील पात्रे व नाटक दोन्हींचे दानवांच्यापासूण रक्षण होऊ लागले. ब्रह्मदेवाने दैत्यांना समजावले की नाट्यवेद सर्वांसाठी आहे. ज्याप्रमाणे ‘इंद्रविजय’ या नाटकमधे देवांचा विजय दाखवला आहे त्याप्रमाणे अन्य नाटकामधे देवांचा पराजय सुद्धा दाखवला जाऊ शकतो. ब्रह्मदेवाच्या समजावण्याने दैत्य शांत झाले. नंतर त्रिपुरदाह, समुद्रमंथन ही नाटके सादर झाली.

नाट्य शब्दाची व्याखा -
योऽयं स्वभावो लोकस्य सुखदु:खसमन्वित: ।
सोऽङ्गाद्यभिनयोपेतो नाट्यत्वमित्यभिधीयते ॥१-११९॥
अर्थ - सुखदु:खमिश्रित जे लोकांचे स्वभाव असतात ते जेव्हा आंगिक वगैरे अभिनयाने सादर केले जातात तेव्हा त्याला नाट्य असे म्हणतात.

नाटकाचा उद्देश -
भरतांनी श्रव्य काव्यापेक्षा दृश्यकाव्य जे नाटक ते सर्वश्रेष्ठ मानले आहे. कारण नाटकाला सार्ववर्णिक वेद म्हटले आहे. इतर वेदांचा उपयोग फक्त द्विजांनाच आहे. परंतु नाटाकाचा आस्वाद सर्व वर्गीय लोकांना घेता येतो. नाटक सर्व प्रकारच्या लोकांचे मनोरंजन करते. कारण त्याचा विषय सीमित नसतो. त्रैलोक्यातील भावदर्शन नाटकाच्या माध्यमातून साकारता येते. नाटक शक्तिहीनांमधे शक्तीचा संचार करते. शौर्यासाठी लोकांचा उत्साह वाढवते. अज्ञानी लोकांना ज्ञान देते तर विद्वानांमधील विद्वत्तेचा उत्कर्ष होतो.
या विशाल विश्वपटावर सुखदु:खांचा खेळ चाललेला असतो. त्यामुळे मानवजीवन सुखमय किंवा दु:खमय बनते. त्या सर्वांचे चित्रण करणे हा नाटकाचा मुख्य उद्देश आहे. म्हणून भरतमुनी म्हणतात की ज्ञान, शिल्प, विद्या कला, कर्म अशी कोणतीही गोष्ट नाही की जी नाटकात दाखवली जात नाही. केवळ मनोरंजन हाही नाटकाचा उद्देश नसावा, तर मनोरंजनाबरोबर मनुष्याने चारित्र्यवान बनावे, त्याचे जीवन उदात्त बनावे यासाठी नाटकाने जागरूक असले पाहिजे.
नाटक उत्तम, अधम व मध्यम अशा सर्व प्रकारच्या लोकांचे प्रतिनिधित्व करते व त्यांच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे उपदेश करते. दु:खार्त, सुखार्त, शोकार्त, तपस्वी अशा सर्व लोकांच्या मनोरंजनाचे ते साधन असावे. त्याचबरोबर धर्म, अर्थ व काम हे तीनही पुरुषार्थ मिळवून देण्यास समर्थ असावे.

नाट्यशास्त्रातील विषय -

भारतमुनींचे नाट्यशास्त्र हा उपलब्ध नाट्यविषयक ग्रंथात प्राचीन ग्रंथ आहे. हा ग्रंथ नाट्यविषयक माहितीने परिपूर्ण ग्रंथ आहे. यात एकूण ३६ अध्याय आहेत.
१ ते १३ अध्याय़ात नाट्योत्पत्ती, अभिनय, वाद्य, नृत्य, मंडप, रंगदेवतेचे पूजन, ताण्डवलक्षण, पूर्वरंग, रसविवेचन, भावव्यंजना, अंगाभिनय, उपांगाभिनय, अशा अनेक विषयांचा ऊहापोह केलेला आहे.
१४ ते ३६ अध्यायांमधे वाचिक अभिनय, नाट्यलक्षण, छंद, अलंकार, काव्याचे गुणदोष, काकू-स्वरविधान, दशरूपक लक्षण, कथावस्तु, संधी, संध्यंग, केशिकी वगैरे वृत्ती, आहार्य अभिनय, नायक-नायिका भेद, चित्राभिनय, नाट्यप्रयोग अशा अनेक विषयांच्या सांगोपांग माहितीने भरलेला असा हा ग्रंथ आहे.

रंगमंच -
भारतीय नाटकांचे प्रयोग आरंभापासून नाट्यगृहातच होतात. कारण विश्वकर्म्यालाच नाट्यगृह रचण्याची आज्ञा केलेली आहे. भरतमुनींनी याविषयी विवरण केलेले आहे. रंगमंचाची सर्वांगीण व्यवस्था, रमणीय सज्जा, व वैज्ञानिक निर्मिती यामुळे भारतीय रंगमंच आपले स्वत:चे असे एक वैशिष्ट्य दाखवून देतो. ते वैशिष्ट्य आजही दिसून येते.
रंगमंचाचे प्राचीन नाव आहे प्रेक्षागृह किंवा रंगशाला. भरतांच्या वचनानुसार प्रेक्षागृहाच्या नाट्यमंडपाचे ३ प्रकार असतात. विकृष्ट, चतुरस्र व त्र्यस्र.
विकृष्ट प्रेक्षागृह - १०८ हात लांबीचे हे कदाचित गोलाकार असावे. हे देवतांसाठी नियत केले गेले होते.
चतुरस्र प्रेक्षागृह - हे आयताकृती असे ६४ हात लांब व ३२ हात रुंद सांगितलेले आहे. राजा व जनतेसाठी हे प्रेक्षागृह आदर्श मानले जात असे.
त्र्यस्र प्रेक्षागृह - हे त्रिकोणाकृती असे. त्याची प्रत्येक भुजा ३२ हात लांब असे. या प्रेक्षागृहाचा उपयोग छोट्या नाटकांच्या प्रयोगासाठी होत असे.

भरतांच्या मते चतुरस्र प्रेक्षागृह हे आदर्श आहे. रंगपीठावरील नटांचे संवाद व गाय़न प्रेक्षकांपर्यंत पोचले पाहिजे. त्यांचा अभिनय प्रेक्षकांना पहाता आला पाहिजे. या दोन्ही गोष्टी चतुरस्र प्रेक्षागृहात शक्य आहेत.
प्रेक्षागृहाची निर्मिती कशी करावी त्याच्या सूचना भरतमुनींनी दिल्या आहेत. प्रेक्षागृहाच्या निर्मितीला शुभमुहूर्तावर प्रारंभ करावा. भूमी समतल करावी. नांगराने नांगरून घ्यावी. चार कोपर्‍यावर चार मुख्य खांब रोवावे.
रंगशाळेचे मुख्य दोन भाग असत. अर्धा भाग प्रेक्षकांना बसण्यासाठी व उरलेल्या अर्ध्या भागात रंगशीर्ष, नेपथ्यगृह, रंगपीठ असावे. १६ हात लांब व  ८ हात रुंद असे रंगपीठ, रंगपीठाच्या मागे नेपथ्यगृह ८ हात लांब ४ हात रूंद व त्यामागे ८ हात लांब व ४ हात रुंद असे रंगशीर्ष असावे. रंगशीर्ष भागात देवी देवतांची पूजा होत असे. नेपथ्यगृहाचा वापर पात्रांच्या सजावटीसाठी होत असे. आणि रंगपीठावरून प्रत्यक्ष अभिनय सादर केला जात असे.
नाट्यगृहाचा मंडप पर्वताच्या गुहेच्या आकाराचा असावा. नाट्यमंडपाच्या भिंतीवर नाना प्रकारची चित्रे असावीत. नाट्यविषयाशी संबंधित चित्रे विशेष उपयुक्त ठरतात असे भरतांचे मत आहे. रंगशाळेची रचना विशेष हवेशीर ठिकाणी नसावी. कारण आवाज श्रोत्यांपर्यंत पोचणार नाही. प्रेक्षकांना बसण्य़ासाठी सोपानाकृती (सोपान = जिना) आसन मांडणी त्यांनी सांगितली आहे. जमिनीपासून १ हात उंच वर अशी पायर्‍यांची आसन रचना असावी. प्रेक्षागृहातील आसने वीट किंवा लाकडापासून बनवली जात असत. ‘इष्टिकादारुभि: कार्यं प्रेक्षकाणां निवेशनम्’. कुठल्याही स्थानावरून रंगमंचावरील पात्रांचा अभिनय दिसला पाहिजे. अशी प्रेक्षागृहाची रचना असवी.
अशाप्रकारे नाट्यकलेच्या प्रारंभी प्रभातकालीच सर्वांगीण व सुव्यवस्थित रूपात भारतामधे प्रेक्षागृह निर्माण झाले आहे.

नाटकाची वैशिष्ट्ये -
भरतमुनींनी नाटकाकरता काही नियम घालून दिलेले आहेत.
१) नाटक यथार्थवादी असावे. परंतु घृणास्पद अथवा उद्वेगजनक दृश्यांचे प्रदर्शन करू नये.
२) रंगपीठावर युद्ध, भोजन, स्वप्न वा प्रणय प्रसंग दाखवू नयेत.
३) एका अंकात एका मुहूर्तामधे म्हणजे साडे तीन तासात घडणार्‍या घटना दाखवाव्यात.
४) नाटक सुखांत असावे.
५) दशरूपकातील नाटक हा प्रकार ५ ते १० अंकी असावा.
६) शृंगार किंवा वीररस मुख्य असावा.
७) राजा, मंत्री, ब्राह्मण, या नटांनी संस्कृत बोलावे व राणी, नोकर व इतर स्त्रिया यांनी प्राकृत बोलावे.
८) विदूषक हास्यरस निर्मिती असला तरी नायकाला अनेक कामात मदत करणारा, नायकाचा मित्र, सर्व स्थितीत समान साथ देणारा व जातीने ब्राह्मण असावा, पण त्याने भाषा मात्र प्राकृत बोलावी.
९) नाटकाचे कथानक लोकप्रसिद्ध असावे, रामायण, महाभारत, पुराण, बृहत्कथा अशा कोणत्यातरी ग्रंथाचा कथानकाला आधार असावा. कथानक कविकल्पित असू नये. प्रसिद्ध कथानकांमधे नाटककाराने आवश्यकतेनुसार बदल करायला हरकत नाही.

नाट्यमंडपात कोणती आवश्यक कृत्ये करावीत, विभिन्न देवतांची पूजा कशी करावी, त्या पूजेचे फळ काय त्याचे सांगोपांग विवेचन त्यांनी तिसर्‍या अध्य़ायात केले आहे.
नृत्याभिनयाच्या संपूर्ण विवेचनात मुद्रा, हात, पाय, मान यांच्या स्थिती, नृत्यास वाद्याची व संगीताची जोड, नूपूर, समूहनृत्य, नृत्याचे नाटकात केव्हा केव्हा संयोजन करावे त्याविषयी माहिती दिलेली आहे.
पूर्वरंग, नांदी, प्रस्तावना, सूत्रधारप्रवेश, यांची माहिती पाचव्या अध्यायात आहे. शृंगार, करुणादी रस, स्थायी संचारी भाव, यांचेही विवरण या ग्रंथात आहे. आठव्या अध्य़ायापासून अभिनयाची माहिती आली आहे. आंगिक, वाचिक, सात्विक हे अभिनयाचे प्रकार सांगून भरतांनी आंगिक अभिनयांतर्गत येणार्‍या उपांगाभिनयाचेही विवेचन केले आहे. रंगभूमीवर प्रवेश करणार्‍या सर्व पात्रांची गती कशी असावी, चालण्याच्या गतीतून भाव कसे व्यक्त करावेत याचे सांगोपांग विवेचन केलेले आहे. निरनिराळ्या मन:स्थितीत भुवया फिरवण्याचे प्रकार, ओठ, डोळे, डोळ्यांच्या पापण्या, बुबुळे हलवण्याचे प्रकार, नासिकेचे सहा प्रकारचे अभिनय, गालांचा अभिनय, हनुवटी, उभे रहाण्याचे प्रकार, हस्तक्रियेने दाखवायचे संकेत इत्यादी सखोल माहितीने भरलेला असा हा ग्रंथ आहे. वाचिक अभिनयात स्वरोच्चारण, काकू स्वराचे विवेचन आहे. नेपथ्य, वेषभूषा, आभूषणे, स्त्री-पुरुषांनी घालायचे अलंकार, फुलांचे अलंकार यांची माहिती आहे. नकली अलंकार घालण्याची सूचना पण भारतांनी केली आहे. वेगवेगळ्या जातीच्या पात्रांची वेशभूषा, हर्ष, शोक वगैरे भाव व्यक्त करण्याच्या पद्धती, संगीत शास्त्रातील ग्राम, मूर्छना, श्रुति, स्वरांचे प्रकार, चार प्रकारची वाद्ये, बासरीचे स्वरूप, वादनविधी, ताल, लय, वादकाचे गुण, योग्यता, कोणत्या वेळी कोणते वाद्य वाजवावे वगैरेंचे सूक्ष्म विवेचन केलेले आहे.
कोणत्या प्रदेशातील लोकांनी कोणत्या प्रकारची केशरचना करावी त्याचीही माहिती आली आहे. भरत म्हणतात की गोपींनी वेणी घालावी. गौड देशातील स्त्रियांनी केस कुरळे करावेत. पूर्वेकडील व उत्तरेकडील स्त्रियांनी कपाळावरील केस कापून बाकीचे उलटे फिरवावेत, मुनिकन्यांनी एक वेणी घालावी. अप्सरा, विद्याधरी वगैरे स्त्रियांनी फणा काढलेल्या सापाप्रमाणे केशरचना करावी. यक्ष स्त्रियांनी केस मोकळे सोडावेत. अवंती देशातील स्त्रियांनी शेपूट सोडलेला अंबाडा घालावा. तर दक्षिणेकडील स्त्रियांनी खोपा घालावा.
पुरुषांनी शेंडी, टक्कल, जटा वेगवेगळ्या प्रकारच्या दाढीमिशा कशा राखाव्यात याचीही माहिती भरतांनी दिलेली आहे.
एकूण नाट्याभिनयास आवश्यक अशा सर्व अंगांनी परिपूर्ण असा हा ग्रंथ आहे.

No comments: